जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवर वरिष्ठांचा ‘वॉच’; सत्तारांच्या धास्तीने काँग्रेस सावध !

Foto

औरंगाबाद :  एकेकाळी काँग्रेसचे निष्ठावंत व जिल्ह्यातील भक्कम नेतृत्व असलेले, काँग्रेसचा राजीनामा दिलेले अब्दुल सत्तार हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ते भाजपात प्रवेश करताना त्यांच्यासह काही जिल्हा परिषद सदस्य जाण्याच्या धास्तीने काँग्रेस सावध झाली असून,  जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवर वरिष्ठांचा वॉच असल्याचे बोलले जाते. याच या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी मुंबईत होणार्‍या जिल्हावार आढाव्या करिता १२ जिल्हा परिषद सदस्य मुंबई येथे गेले आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकी दरम्यानच काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर लागलेल्या निकालात  राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. एवढेच नव्हे तर उमेदवाराचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले. यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस एक हाती सांभाळू शकेल असा एकही चेहरा सध्या काँग्रेसकडे नाही.  सत्तार हे भाजपचा वाटेवर असून केवळ प्रवेशाची औपचारिकता शिल्लक असल्याचे बोलले जाते. या वेळेत यांच्यासह जिल्हा परिषदेचे काही सदस्य जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. शहरातील गांधी भवन येथे पार पडलेल्या बैठकीत काही पदाधिकार्‍यांनी तसा उल्लेखही केला होता. 

यापाठोपाठ काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांशी केलेली गूफ्तगु, आज शुक्रवारी मुबंई येथे होत असलेल्या बैठकी करिता सुमारे १२ जिल्हा परिषद सदस्य गेले असल्याचे समजते. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता काँग्रेसच्या स्थानिक लोकप्रतिनिधींवर वरिष्ठांचा वॉच असल्याचे बोलले जात आहे. 

सेनेला वंचित ठेवून एकहाती सत्ता मिळवण्याचे भाजपाचे प्रयत्न 
स जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस -शिवसेनेची  सत्ता असून काँग्रेसचे १६, शिवसेनेचे १८, भाजपचे २३राष्ट्रवादीचे ३, मनसे १, रिपाई डेमोक्रॅटिक १ असे बलाबल आहे. यातील काँग्रेसचे सात ते आठ सदस्य सत्तार यांच्या मार्फत पक्षाकडे आणण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याची चर्चा ऐकायला मिळते. यामुळे भाजपा जिल्हा परिषदेत शिवसेनेला दूर ठेवून एकहाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे कुठलेच जिल्हा परिषद सदस्य सत्तार यांच्या मागे जाणार नसल्याचा दावा पदाधिकार्‍यांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र काही सदस्य सत्तार यांच्या सोबत जाण्याची धास्ती काँग्रेसला असल्याचे गेल्या काही दिवसातील घटनाक्रमावरून दिसून येते.